कराडमध्ये वादळी पावसाने होर्डिंगचा भाग कोसळला
कराड परिसरात मंगळवारी विजांच्या कडकडाटांसह वादळी पाऊस झाला. शहरात दत्त चौकात मोठ्या होर्डिंगचा काही भाग कोसळला.
कराड : कराड परिसरात मंगळवारी विजांच्या कडकडाटांसह वादळी पाऊस झाला. शहरात दत्त चौकात मोठ्या होर्डिंगचा काही भाग कोसळला. यामध्ये दोन मुली बचावल्या.
ग्रामीण भागात अनेक ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे. या पावसाने हवेत गारवा निर्माण झाला असून उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे. वादळी पावसात दत्त चौकातील सूर्या कॉम्लेक्सवरील लोखंडी होर्डिंगचा काही भाग तुटून रस्त्यावर कोसळला. यामध्ये सायकल वरून जाणार्या दोन मुली थोडक्यात बचावल्या. तरीही पडलेल्या होर्डिंगमध्ये अडकून त्या पडल्या. हे होर्डिंग बेकायशीर आहेत. कराड नगरपालिकेने ती तात्काळ हटवावीत अशी मागणी होत आहे. सोसाट्याचा वारा सुटला. आभाळ भरून आले. चार -साडेचारच्या सुमारास विजांच्या कडकडाटांसह वादळी पाऊस कोसळला. कराड शहराबरोबर कार्वे, कोरेगाव, वडगाव, शेरे, दुशेरे, शेणोली, रेठरे कारखाना आदी भागात दमदार पाऊस कोसळल्याचे वृत्त आहे. तसेच मसूर पूर्व भागात काही ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली.