ओंकार ठोंबरेला राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक
फलटण तालुक्यातील हणमंतवाडी (आदर्की खुर्द) चा कुस्तीपटू पै. ओंकार रमेश ठोंबरे याने आपली जिद्द, मेहनत आणि चिकाटी यांच्या जोरावर राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक पटकावून सातारा जिल्ह्याचा मान उंचावला आहे.
सातारा : फलटण तालुक्यातील हणमंतवाडी (आदर्की खुर्द) चा कुस्तीपटू पै. ओंकार रमेश ठोंबरे याने आपली जिद्द, मेहनत आणि चिकाटी यांच्या जोरावर राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक पटकावून सातारा जिल्ह्याचा मान उंचावला आहे. अहिल्यानगर येथे नुकत्याच पार पडलेल्या १९ वर्षाखालील वयोगटातील ७० किलो वजनगटाच्या कुस्ती स्पर्धेत ओंकारने उत्कृष्ट कामगिरी करत तिसरे स्थान मिळवले.
ओंकार हा हणमंतवाडी (आदर्की खुर्द) ता. फलटण येथील उपसरपंच पै. अक्षय ठोंबरे यांचा धाकटा भाऊ आहे. त्याने यापूर्वी सिंधुदुर्ग येथे झालेल्या कोल्हापूर विभागीय कुस्ती स्पर्धेतही उल्लेखनीय यश संपादन केले होते. राज्यस्तरीय स्पर्धेत ओंकारने तगड्या प्रतिस्पर्ध्यांशी झुंज देत आपल्या दमदार खेळाची छाप पाडली होती.
त्याच्या या यशाबद्दल आदर्की खुर्दच्या सरपंच निलम निंबाळकर, माजी सरपंच सतीश निंबाळकर, माजी सरपंच सौरभ निंबाळकर यांनी ओंकारचे अभिनंदन केले. गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून ओंकारच्या या कामगिरीमुळे स्थानिक पातळीवर नवोदित खेळाडूंनाही प्रेरणा मिळाली आहे. कुस्तीप्रेमी आणि प्रशिक्षक वर्गाकडूनही ओंकारवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भविष्यात राष्ट्रीय पातळीवर झेंडा फडकवण्याचे त्याचे लक्ष्य असून, त्यासाठी तो सातत्याने मेहनत घेत आहे.