पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन
सातारा जिल्ह्यातील विविध सामाजिक प्रश्नाच्या संदर्भाने पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश उबाळे यांनी गुरुवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे.
सातारा : सातारा जिल्ह्यातील विविध सामाजिक प्रश्नाच्या संदर्भाने पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश उबाळे यांनी गुरुवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. शिरढोण तालुका कोरेगाव येथील शौचालय प्रकरण, वाढे फाटा येथील अनधिकृत गॅस स्टेशन, वंदना रेसिडेन्सी न्यू विकास नगर खेड येथे अनधिकृत बांधकाम अशा विविध विषयांच्या संदर्भाने ठिय्या आंदोलनाच्या निमित्ताने उबाळे यांनी प्रशासनाला जाब विचारला आहे.
कोरेगाव वाठार रस्ता खोदून काम न करणाऱ्या शिवसमर्थ कंपनीत ब्लॅकलिस्ट करावे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर वर कारवाई करावी, अशी मागणी उबाळे यांची आहे. या मार्गावर आत्तापर्यंत 64 अपघात झाल्याची नोंद आहे. न्यू विकास नगर खेड येथे झालेल्या आठ अनधिकृत बांधकामाची चौकशी करण्यात यावी आणि टाऊन प्लॅनिंगची फसवणूक केल्याबाबत फ्लॅट धारकांवर गुन्हा नोंद करावा याची मागणी त्यांनी केली. तसेच कोरेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत खुलेआम मटका व अवैध व्यवसाय सुरू आहेत व पोलीस निरीक्षक या गुन्हेगारांना खतपाणी घालत आहेत ही बाब गंभीर आहे. कोरेगाव पोलीस निरीक्षकांना तात्काळ निलंबित करावे अशी ही त्यांची मागणी आहे. वाढे फाटा भूमापनगट क्रमांक 63 येथील पूर क्षेत्रात अनधिकृत पद्धतीने बांधलेले गॅस स्टेशन तात्काळ रद्द करावे, तसेच शिरढोण तालुका कोरेगाव येथे मागासवर्गीय समाजाची आठ शौचालय पाडण्यात आली. महिलांची गैरसोय करणाऱ्या गटविकास अधिकारी आणि शिरढोण ग्राम विकास अधिकारी यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी उबाळे यांची मागणी आहे.
पाच विषयांच्या संदर्भाने उबाळे यांनी जिल्हा प्रशासनाचे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना निवेदन सादर करून बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. या विषयात संदर्भात जिल्हा प्रशासन जोपर्यंत रोखठोक भूमिका घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा उबाळे यांनी दिला आहे.