देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याचा कराडमध्ये बहुसंख्येने करण्यात आला निषेध
कराड येथील मलकापूर - बैलबाजार रोडलगत शुक्रवारी भाजपचे उमेदवार अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली.
कराड : कराड येथील मलकापूर - बैलबाजार रोडलगत शुक्रवारी भाजपचे उमेदवार अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली. या सभेत ना. फडणवीस यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय कॉंग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याबद्दल असभ्य व खालच्या पातळीवर जावून टिका केली. या निषेधार्थ सायंकाळी येथील दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ राष्ट्रीय कॉंग्रेस, युवक कॉंग्रेस, महिला कॉंग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी एकत्र येवून निषेध नोंदवत आंदोलन केले.
यावेळी महिला, युवक व कॉंग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर ना. फडणवीस व भाजप सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. भाजप कराडच्या संस्कृतीला कलंक लावणारा पक्ष यासह एकीकडे लाडकी बहिण अन् दुसरीकडे महिलांचा अपमान असे आशय लिहलेले फलक घेवून महिलांनी ना. फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या.
प्रदेश युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे म्हणाले, कराडच्या मातीमध्ये यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत राजकारणाचा पाया रचला. आ. पृथ्वीराज चव्हाण व माजी आ. विलासराव पाटील - उंडाळकर यांनी आयुष्यभर यशवंतराव चव्हाण यांची विचारसरणी, सुसंस्कृत कार्याची पाठराखण केली. कराडच्या या पवित्र मातीमध्ये येवून ना. देवेंद्र फडणवीस यांनी येवून आपला खरा चेहरा दाखवला. त्यांचे पृथ्वीराज चव्हाण यांच्याबद्दलचे वक्तव्य निंदनीय आहे. ना. फडणवीस बाबांच्यावर बोलत असताना भाजपचा उमेदवार हसताना दिसला. त्यांनाही आम्ही उत्तर देवू.
ते म्हणाले, कराड दक्षिणमधील भाजपचे उमेदवार जातीयवादी विचाराचे विष पेरण्याचे काम कराडच्या सुसंस्कृत भूमीत करत आहेत. याला कराडची जनता कधीच स्थान देणार नाही. ना. फडणवीस यांनी महिला व पृथ्वीराज बाबांची माफी मागावी, अन्यथा मोर्चा काढू व त्यांना कराड तालुक्यात पाय ठेवू देणार नाही.
कराड दक्षिण कॉंग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे म्हणाले, ना. फडणवीस यांनी असभ्य भाषेमध्ये पृथ्वीराजबाबा आणि महिलांबद्दल वक्तव्य केले आहे. यातून भाजपची मूळ विचारसरणी स्पष्ट झाली आहे. त्यांच्या महिलांबद्दल काय भावना आहे, हे त्यांच्या ओठात खर्या अर्थाने आले आहे.
वैशाली जाधव म्हणाल्या, आमच्याच कराडात येवून आमचे मायबाप असणार्या पृथ्वीराज बाबां बद्दल बोलतात. हीच का त्यांची संस्कृती? ना. फडणवीस यांनी माफी मागितली पाहिजे. अन्यथा महिला त्यांना मतपेटीतून हिसका दाखवतील.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जिल्हा संघटक अनिता जाधव म्हणाल्या, ना. फडणवीस यांनी माफी न मागितल्यास धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही. पृथ्वीराज बाबा हे आमचा स्वाभिमान आहेत व तो आम्हाला जपायचा आहे. भाजपच्या नेत्यांची टिका करण्याची पातळी एकंदरीत बघता बाबांबद्दल बोलण्यास काही नसल्याने ते अशी बेताल वक्तव्ये करत आहेत.