अमित शाह यांचे त्रिवेणी संगमावर श्रद्धापूर्वक शाही स्नान
देशात सध्या उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुभमेळ्याची खूपच चर्चा आहे. रोज येथे लाखोंच्या संख्येने भाविक येत आहेत.
प्रयागराज : देशात सध्या उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुभमेळ्याची खूपच चर्चा आहे. रोज येथे लाखोंच्या संख्येने भाविक येत आहेत. त्यातच सोमवारी गृहमंत्री अमित शाह यांनी प्रयागराजमध्ये पोहोचून महाकुंभ २०२५ मध्ये सहभाग घेतला आणि अतिशय श्रद्धापूर्वक शाही स्नान केले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह गृहमंत्र्यांनी त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केले. त्याचा व्हिडीओही व्हायरल झाला.
अमित शाह यांनी सकाळीच सोशल मीडिया हँडल X वर पोस्ट करत म्हटले होते की, कुंभ हे समरसतेवर आधारित जीवनाचे आपले शाश्वत तत्वज्ञान आहे. आज मी प्रयागराज या धार्मिक नगरीमध्ये एकता आणि अखंडतेच्या या महान उत्सवात संगमात स्नान करण्यासाठी आणि संतांचे आशीर्वाद घेण्यासाठी जाणार आहे. त्यासाठी मी उत्सुक आहे. प्रयागराज येथे पोहोचल्यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने त्यांचे पुष्पहार अर्पण करून भव्य स्वागत केले.
दरम्यान, महाकुंभ मीडिया सेंटरने गृहमंत्री अमित शाह २७ जानेवारीला महाकुंभला पोहोचणार असल्याबाबत एक प्रसिद्धीपत्रक जारी केले होते. या प्रसिद्धीपत्रकानुसार, अमित शाह प्रथम प्रयागराजला पोहोचतील आणि त्रिवेणी संगम येथे गंगेत स्नान करतील. यानंतर ते बडे हनुमानजी मंदिर आणि अक्षय वट येथे जातील. यासोबतच ते महाराज आणि इतर संतांसोबत भोजन करतील आणि जुना आखाड्याला भेट देतील. धर्मनगरीच्या भेटीदरम्यान ते गुरू शरणानंद जी यांच्या आश्रमात जाऊन गुरू शरणानंद जी आणि गोविंद गिरी जी महाराज यांची भेट घेतील. यानंतर ते शृंगेरी, पुरी आणि द्वारकाच्या शंकराचार्यांचीही भेट घेतील. त्यानंतर अमित शाह संध्याकाळी दिल्लीला रवाना होतील.