सातारा हिल हाफ मॅरेथॉनला देशभरातून प्रतिसाद; यवतेश्वर घाटातून धावले तब्बल साडेआठ हजार स्पर्धक
प्रसन्न अशा पहाटेच्या वातावरणात ऐतिहासिक साताऱ्यात जेबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या उत्साही वातावरणात पार पडली. तब्बल 8500 धावपट्टू या स्पर्धेत धावले.
सातारा : प्रसन्न अशा पहाटेच्या वातावरणात ऐतिहासिक साताऱ्यात जेबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या उत्साही वातावरणात पार पडली. तब्बल 8500 धावपट्टू या स्पर्धेत धावले. जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करुन या स्पर्धेची शानदार सुरुवात झाली, तर बक्षिस वितरण पालकमंत्री शंभूराज देसाई आणि लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. पुरुषांमध्ये पहिला क्रमांक सांगलीच्या अंकुश लक्ष्मण हाके याने 1 तास 10 मिनिट 8 सेकंदात, तर महिलांमध्ये साक्षी जाड्याळ हिने 1 तास 29 मिनिट 35 सेकंदात अंतर पार करत पटकावला.
सातारा रनर्स फौंडेशनच्यवतीने 14 वर्षी आयोजित केलेल्या जेबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉनकडे सगळ्याच्या नजरा लागून राहिल्या होत्या. स्पर्धेसाठी पहाटेच उठून स्पर्धक स्पर्धेच्या ठिकाणी हजर राहिले होते. पोलीस कवायत मैदान येथे स्पर्धकांच्या अलोट गर्दीत उत्साह संचारला होता. अयोजकांनी नियोजन केल्यानुसार शॉर्प टायमिंगला जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करुन स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धेसाठी आलेल्या धावपट्टूंनी धावण्यास सुरुवात केली. धावपट्टूंना प्रोत्साहित करण्यासाठी जागोजागी आयोजकांनी ढोल ताशा तसेच भारतीय संस्कृतितील नृत्य ठेवले होते. स्पर्धकांमध्ये चढाओढ सुरु होती. अवघड अशा यवतेश्वर घाटातून चढण चढताना धावपट्टूंचा वेग मंदावला होता. पुढे चढ चढल्यानंतर पुन्हा वेग वाढल्याचे दिसून येत होते. पुन्हा परतीच्या प्रवासामध्ये धावपट्टूमध्ये वाऱ्यांच्या वेगाने स्पर्धा होताना दिसत होती. चौकाचौकात धावपट्टूंचे स्वागत केले जात होते. पहिला क्रमांक सांगलीच्या अंकुल लक्ष्मण हाके याने, तर महिलांमध्ये पहिला क्रमांक साक्षी जाड्याळ हिने पटकावला. यशस्वी सर्व धावपट्टूंचे कौतुक पालकमंत्री शंभूराज देसाई आणि लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.
देशभरातून स्पर्धेला प्रतिसाद
आज साताऱ्यात चौदाव्या वर्षीही सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा पार पडली आहे. सलग चौदा वर्ष चांगले आयोजन केले जात आहे. या स्पर्धेत आठ हजार पेक्षा जास्त धावपट्टू सहभागी झाले होते. पहिला क्रमांक सांगलीतला, दुसरा क्रमांक हरियाणामधील आणि तिसरा पंजाबमधील आहे. त्यामुळे पूर्ण देशातून सहभाग या स्पर्धेला मिळतो आहे. हे या स्पर्धेचे प्रतिक आहे. उपेंद्र पंडित, डॉ. शेखर घोरपडे, शैलेश ढवळीकर यांच्यासह सगळी आयोजक मंडळी झोकून देवून काम करतात. त्यामुळे ही स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडली.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. देसाई यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे -
प्रथम - अंकुश लक्ष्मण हाके
1 तास 10 मिनीट 8 सेकंद
द्वितीय - लव्हप्रित सिंग
1 तास 11 मिनिट 6 सेंकद
तृतीय - धर्मेंद्र डी.
1 तास 12 मिनिट 3 सेंकद
महिला
प्रथम - साक्षी जाड्याळ
1 तास 29 मिनिट 35 सेकंद
द्वितीय - ऋतुजा पाटील
1 तास 30 मिनिट 52 सेकंद
तृतीय - सोनाली देसाई
1 तास 33 मिनिट 42 सेकंद