राज्याचे माजी राज्यापाल एस एम कृष्णा यांचे आज (ता.१०) पहाटे २.४५ वाजता निधन झाले. त्यांची वयाच्या ९२ व्या वर्षी बेंगळुरू येथील राहत्या घरी प्राणज्योत मावळली. एस एम कृष्णा देशाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री देखील राहिले आहेत.
बेंगळुरू : राज्याचे माजी राज्यापाल एस एम कृष्णा यांचे आज (ता.१०) पहाटे २.४५ वाजता निधन झाले. त्यांची वयाच्या ९२ व्या वर्षी बेंगळुरू येथील राहत्या घरी प्राणज्योत मावळली. एस एम कृष्णा देशाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री देखील राहिले आहेत. तर ते तीन वेळी केंद्रीय मंत्रीही होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने महाराष्ट्रासह देशभरात शोककळा पसरली आहे.
याबातमीनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंदेशात सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. त्यांनी, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री श्री एस. एम. कृष्णा जी यांच्या निधनाने विकासाची कास धरणारे एक उत्तुंग व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेले, अशा शब्दात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
तसेच फडणवीस यांनी, महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून काम करताना त्यांनी राज्याला मार्गदर्शन करण्याचे काम केले. विधानसभा, विधानपरिषद, लोकसभा, राज्यसभा अशा सर्व सभागृहात काम करताना त्यांनी, विधानसभा अध्यक्ष, मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्यपाल अशी सर्व पदे भूषविली. विद्यापीठ सुधारणा हे त्यांचे आवडीचे क्षेत्र होते. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे कुटुंबीय आणि आप्तस्वकीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
एस. एम. कृष्णा यांना राजकारणातले दिग्गज नेते मानले जात असून त्यांनी २०१७ मध्ये भाजप प्रवेश केला होता. यानंतर ते राजकीय वनवासात गेले होते. मात्र आपल्या साठ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी आमदार, खासदार, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री राज्यपाल या पदांसह अनेक महत्त्वाची सार्वजनिक पदे भुषवली. एस. एम. कृष्णा यांना २०२३ मध्ये भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण देण्यात आला. आता त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी प्रेमा, दोन मुली शांभवी आणि मालविका आहेत.
एस एम कृष्णा, ज्यांचे पूर्ण नाव सोमनहल्ली मल्लय्या कृष्णा असून त्यांचा जन्म १ मे १९३२ रोजी मांड्या जिल्ह्यातील सोमनहल्ली गावात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण म्हैसूर येथे झाले असून बंगळुरूच्या सरकारी लॉ कॉलेजमधून त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले. तसेच त्यांचे अमेरिकेतल्या लॉ स्कूलमध्ये शिक्षण झाले होते.
कृष्णा यांनी त्यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत अनेक महत्त्वाची पदे भूषवली. कृष्णा यांनी मंड्यातून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरूवात केली. ते १९६२ मध्ये पहिल्यांदा अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झाले. यानंतर १९६४ मध्ये त्यांनी प्रेमा यांच्याशी लग्न केले. ते प्रजा सोशालिस्ट पार्टीच्या तिकिटावर देखील जिंकले होते. १९६८ मध्ये कृष्णा मंड्या मतदारसंघातून पहिल्यांदा खासदार झाले. ते येथून पुन्हा १९७१ ला खासदार झाले. तर १९७२ ते ७७ या कालावधीत ते आमदार झाले राहिले.
त्यावेळी ते देवराज उर्स मंत्रिमंडळात वाणिज्य उद्योग आणि संसदीय कामकाज मंत्री होते. १९९९ मधील निवडणुकीवेळी ते कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष होते. यावेळी पक्षाला मोठे यश मिळाल्याने त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली होती. ते राज्यसभा सदस्य, कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री देखील राहिले आहेत. तर राजकारणात येण्यापूर्वी ते बेंगळुरूच्या श्री जगद्गुरू रेणुकाचार्य लॉ कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय कायद्याचे प्राध्यापकही होते.