मधुरा अन् ओजसने घेतला दोन सुवर्णपदकांचा वेध

चीनमधील शांघाय येथे झालेल्या जागतिक तिरंदाजी फेज-२ स्पर्धेत ५० मीटर कंपाउंड राउंड या प्रकारात छत्रपती शिवाजी कॉलेजची खेळाडू मधुरा धामणगावकर हिने वैयक्तिक प्रकारात एक सुवर्णपदक, सांघिक माहिला गटात एक रौप्य, तर महिला मिश्र गटात एक कांस्यपदक भारतासाठी पटकावत आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची यशस्वीपणे सुरुवात केली.
सातारा : चीनमधील शांघाय येथे झालेल्या जागतिक तिरंदाजी फेज-२ स्पर्धेत ५० मीटर कंपाउंड राउंड या प्रकारात छत्रपती शिवाजी कॉलेजची खेळाडू मधुरा धामणगावकर हिने वैयक्तिक प्रकारात एक सुवर्णपदक, सांघिक माहिला गटात एक रौप्य, तर महिला मिश्र गटात एक कांस्यपदक भारतासाठी पटकावत आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची यशस्वीपणे सुरुवात केली. याच महाविद्यालयाचा खेळाडू ओजस देवतळे (अर्जुन पुरस्कार विजेता) याने पुरुष सांघिक प्रकारात भारतास एक सुवर्णपदक मिळवले.
गत एप्रिल महिन्यात अमेरिकेत झालेल्या जागतिक तिरंदाजी फेज-१ स्पर्धेत पुरुष सांघिक प्रकारात कांस्यपदक मिळवले होते, तर मधुरास मात्र या स्पर्धेसाठी पात्र असूनसुद्धा पासपोर्ट व्हिसा वेळेत न मिळाल्याने स्पर्धेस मुकावे लागले होते. याची भरपाई तिने या स्पर्धेत केली. येत्या जुलै महिन्यात जर्मनीत होणाऱ्या जागतिक विद्यापीठ स्पर्धेसाठी भारतीय तिरंदाजी संघात मधुराचा समावेश आहे. मधुरा आणि ओजस हे साताऱ्यातील दृष्टी अॅकॅडमीचे प्रवीण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात.
रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष चंद्रकांत दळवी, संघटक डॉ. अनिल पाटील, संस्थेचे सचिव विकास देशमुख, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के, संस्थेच्या ऑडिट विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे, जिमखाना विभागाचे प्रा. डॉ. धनंजय नलवडे, प्रा. विक्रमसिंह ननावरे आदींनी यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
‘कर्मवीर पुण्यतिथी’निमित्त झालेल्या रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात या दोघांसह छत्रपती शिवाजी कॉलेजची आंतरराष्ट्रीय खेळाडू संस्कृती मोरे (बुद्धिबळ), साक्षी जांभळे (रग्बी), पृथ्वीराज पाटील (एबी) यांना प्रत्येकी दोन लाख रुपये देऊन सन्मानित करण्यात आले.