रविवार पेठ येथील नागरिकांचा बोंबाबोंब आंदोलनाचा इशारा
प्रभाग क्रमांक 15 रविवार पेठ येथील गीतांजली शाळेच्या बाजूला असणाऱ्या शौचालयाची दुरावस्था झाली आहे. या शौचालयाचे सांडपाणी उघड्यावर येत असून हे शौचालय निरुपयोगी ठरले आहे.
सातारा : प्रभाग क्रमांक 15 रविवार पेठ येथील गीतांजली शाळेच्या बाजूला असणाऱ्या शौचालयाची दुरावस्था झाली आहे. या शौचालयाचे सांडपाणी उघड्यावर येत असून हे शौचालय निरुपयोगी ठरले आहे. येथील नागरिकांसाठी सोयीचे असणाऱ्या या शौचालयाची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी येथील नागरिकांची आहे. अथवा नागरिकांच्या वतीने सातारा नगरपालिकेच्या समोर बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
येथील शौचालयाची दुरुस्ती तत्काळ करावी, याबाबत संभाजी ब्रिगेडच्या वतीने 7 जानेवारीला निवेदन देण्यात आले होते. वारंवार पाठपुरावा करूनही सातारा नगरपालिका याकडे दुर्लक्ष करत आहे. याबाबत सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख राकेश गलीयल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता याबाबत दुरुस्ती प्रस्ताव दिले असून लवकरच या शौचालयांची दुरुस्ती होईल असे आश्वासन देण्यात आले. मात्र प्रत्यक्षात शौचालयांची दरवाजे मोकळी झाली असून टाक्या सुद्धा उपसल्या न गेल्याने त्याचे सांडपाणी रस्त्यावर आले आहे. शौचालयाच्या टाकीवर झाकण नसल्याने येथील नागरिकांच्या जीवाला धोका सुद्धा आहे. त्याची परिसरामध्ये दुर्गंधी पसरली आहे डेंगू मलेरिया अशा भयानक आजाराला सामोरे जाणे लागण्याची शक्यता आहे. शौचालयाच्या बाजूलाच गीतांजली विद्या मंदिर ही नगरपालिकेची शाळा असून येथील शाळेच्या विद्यार्थ्यांना सुद्धा या दुर्गंधीचा सामना करावा लागत असून त्यांच्याही आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.
सातारा नगरपालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाने तात्काळ या शौचालयांची दुरुस्ती करावी, याबाबत आत्तापर्यंत आरोग्य विभागाला चार स्मरणपत्रे देण्यात आली आहेत. मात्र अजूनही याबाबत कार्यवाही न झाल्याने नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.