एसटी लूटमार प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून उलगडा

पुणे-बेंगलोर महामार्गावर वराडे, तालुका कराड येथे पहाटेच्या सुमारास एसटी बस मधील कुरिअर कंपनीच्या कर्मचार्याला मारहाण करून 92 तोळ्याचे दागिने व 32 हजार रुपये रोख असलेली बॅग जबरीने चोरण्यात आली होती.
सातारा : पुणे-बेंगलोर महामार्गावर वराडे, तालुका कराड येथे पहाटेच्या सुमारास एसटी बस मधील कुरिअर कंपनीच्या कर्मचार्याला मारहाण करून 92 तोळ्याचे दागिने व 32 हजार रुपये रोख असलेली बॅग जबरीने चोरण्यात आली होती. या टोळीचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला आहे. या प्रकरणात चार आरोपी अटक करण्यात आले असून त्यांच्याकडून दागिने रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली गाडी असा 76 लाख 94 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
याप्रकरणी राहुल दिनेश शिंगाडे राहणार शिंगणापूर तालुका माण जिल्हा सातारा, महावीर हनुपंत कोळपे राहणार बिवी तालुका फलटण, अभिजीत महादेव करे राहणार रावडी तालुका फलटण, अतुल महादेव काळे राहणार भांब तालुका माळशिरस या चौघांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. तसेच या गुन्ह्यात वापरण्यात आलेली स्विफ्ट डिझायर गाडी सुद्धा जप्त झाली आहे. या गुन्ह्यात अन्य दोनजण फरार असून त्यांच्या तपासासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर, पोलीस हवालदार हसन तडवी, मनोज जाधव, प्रवीण कांबळे, प्रवीण पवार या पथकाने फिर्यादीची संपूर्ण माहिती घेऊन त्या पद्धतीने तपास सुरू केला. शिंगाडे व कोळपे यांना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस केली असता आरोपी महावीर कोळपे हा कृष्णा कुरिअर कोल्हापूर येथे नोकरीस होता. त्याला कुरिअर कंपनीचा कर्मचारी सोन्याचे दागिने कधी घेऊन जातो हे माहीत होते. तो संदर्भ घेऊन तपास सुरू झाल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. दिनांक 29 जुलै रोजी आरोपी स्विफ्ट डिझायर गाडीतून कोल्हापूर येथे गेले होते. तेथे बस स्थानकावर थांबून साडेनऊच्या सुमारास रात्री त्यांनी कोल्हापूर-मुंबई बसचा पाठलाग केला. बस मध्ये एक फरारी आरोपी बसला होता. एसटी वराडे गावच्या हद्दीतील एका हॉटेलवर चहापानासाठी थांबली असता फरारी आरोपीने इतरांना इशारा केला. त्यावेळी राहुल शिंगाडे व अतुल काळे यांनी कुरियर कंपनीच्या कर्मचार्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण करत त्याच्या जवळील सोन्याची बॅग व रोख रक्कम झटापट करून लांबवली.
उर्वरित आरोपींच्या संदर्भाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारामार्फत तपास पुढे सरकवण्यात आला. अतुल काळे व अभिजीत करे हे खुटबाव तालुका माण जिल्हा सातारा पासून माळशिरस गावाच्या हद्दीतील भांब परिसरातील भालधोंडीच्या जंगलात लपून बसल्याची माहिती प्राप्त झाली. या जंगलाचे तपास पथकाने ड्रोन कॅमेर्याच्या साह्याने सर्वेक्षण केले व आरोपींचा ठावठिकाणा समजून घेतला. दिनांक 24 ऑगस्ट रोजी पोलिसांनी त्यांचे स्थळ निश्चित करून 25 जुलै रोजी जंगलातून पायी चालत येत असताना आरोपींना घटनास्थळी जाऊन अटक केली. आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पथकाने ज्यांना चारी बाजूने घेरून ताब्यात घेतले.
संबंधित अटक आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आरोपी अतुल काळे याने घराजवळील उकिरड्यांमध्ये लपवून ठेवलेले 92 तोळे दागिने व सोन्याची बिस्किटे पोलिसांना तपासात सुपूर्त केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर करीत आहेत.
या कारवाईत पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, पोलीस अंमलदार साबीर मुल्ला, मनोज जाधव, प्रवीण कांबळे, अजय जाधव, अमित झेंडे, प्रवीण पवार, संकेत निकम, अमृत कर्पे, विजय निकम, दलजीत जगदाळे, आनंदा भोई यांनी सहभाग घेतला होता. या पथकाचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांनी अभिनंदन केले आहे.