खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी एकाला जन्मठेपेसह दीड लाखांच्या दंडाची शिक्षा
जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी एकाला न्यायालयाने जन्मठेपेसह सुमारे दीड लाखांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
सातारा : जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी एकाला न्यायालयाने जन्मठेपेसह सुमारे दीड लाखांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
अभिजीत अशोक शिंदे रा. रविवार पेठ, सातारा असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 20 रोजी सायंकाळी सात ते साडेसात वाजण्याच्या दरम्यान आरोपी अभिजीत अशोक शिंदे विशाल अशोक शिंदे आणि वैभव अशोक शिंदे सर्व राहणार रविवार पेठ सातारा याने तक्रारदाराच्या पुतणीची छेड काढली होती यावरून तक्रारदार हे आरोपीकडे जा विचारण्यासाठी गेले असता संबंधितांनी त्याला शिवीगाळ दमदाटी करून निलेश कचरे याला धरून आरोपी अभिजीत अशोक शिंदे याने चाकूने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता तसेच इतर दोघे सोडवण्यासाठी गेले असता त्यांनाही अभिजीत शिंदे यांनी चाकूने मारून गंभीर जखमी केले होते याबाबतची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. यावरचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. के. साबळे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
हा खटला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्ग दोन एस. आर. तांबोळी यांच्यासमोर चालला. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील आशीर्वाद कुलकर्णी यांनी काम पाहिले. खटल्यात आठ साक्षीदार तपासण्यात आले.
यानंतर परिस्थितीजन्य पुरावा व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तसेच अन्य साक्षीदारांच्या साक्षीवरून न्यायाधीश एस. आर. तांबोळी यांनी अभिजीत अशोक शिंदे यास दोषी ठरवून जन्मठेपेसह दीड लाखांचा दंड, भादंवि 325 अन्वये दोषी ठरवून सात वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावास, 323 अन्वये दोषी ठरवून सहा महिने साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली. दंडाच्या रकमेपैकी प्रत्येकी 60 हजार रुपये जखमी साक्षीदारांना आणि 25 हजार रुपये फिर्यादींना देण्याचे नमूद करण्यात आले आहे.
खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलीस अंमलदार अजित फरांदे आणि कुमार जाधव यांनी सहकार्य केले.