फलटण तालुक्यातील फडतरे टोळी दोन वर्षासाठी हद्दपार
फलटण तालुक्यातील टोळीप्रमुख भरत लक्ष्मण फडतरे याच्यासह मनोज राजेंद्र हिप्परकर दोघेही राहणार मलठण, तालुका फलटण या दोघांना सातारा जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर व सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.
सातारा : फलटण तालुक्यातील टोळीप्रमुख भरत लक्ष्मण फडतरे याच्यासह मनोज राजेंद्र हिप्परकर दोघेही राहणार मलठण, तालुका फलटण या दोघांना सातारा जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर व सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी हे आदेश पारित केले आहेत.
फलटण शहर व तालुका परिसरात भरत फडतरे व मनोज हिप्परकर या दोघांनी गर्दी मारामारी, अपहरण, खंडणी यांसारखे गंभीर गुन्हे केले होते. फलटण शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा यांनी या टोळी विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 नुसार दोन वर्ष तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरणाला सादर केला होता. या प्रस्तावाची चौकशी फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी केली होती.
या टोळीतील इसमांवर वेळोवेळी अटक व प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्या गुन्हे करण्याच्या प्रवृत्तीत फरक पडत नव्हता. या टोळीतील इसम फलटण शहर परिसरात सातत्याने गुन्हे करीत होते. त्यांच्यावर कायद्याचा कोणताच धाक न राहता नागरिकांना उपद्रव होत होता. त्यानुषंगाने पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी हद्दपार प्राधिकरण अध्यक्ष या नात्याने या दोघांना संपूर्ण सातारा जिल्हा व पुणे जिल्ह्यातील बारामती पुरंदर व सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस या तालुक्यातून दोन वर्षासाठी हद्दपार केले आहे.
सातारा जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी यापुढे सराईत गुन्हेगारांच्या विरोधात हद्दपारी मोक्का एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करण्यात येणार आहेत. हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, राजू कांबळे, शिवाजी भिसे, अमित सपकाळ, अनुराधा सणस, फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार बापू धायगुडे, पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र टिके यांनी हद्दपार प्राधिकरणापुढे योग्य तो पुरावा सादर केला.