वडजलमध्ये पावणेदोन लाखांची चोरी

वडजल (ता. माण) येथील कारंडेवाडी फाट्याजवळ असणाऱ्या विशाल इलेक्ट्रिकल मोटर रिवाईडिंगच्या दुकानाच्या खिडकीचे लोखंडी गज कापून दोन अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला.
म्हसवड : वडजल (ता. माण) येथील कारंडेवाडी फाट्याजवळ असणाऱ्या विशाल इलेक्ट्रिकल मोटर रिवाईडिंगच्या दुकानाच्या खिडकीचे लोखंडी गज कापून दोन अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. यामध्ये एक लाख ७० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
याबाबत म्हसवड पोलिस ठाण्यात महादेव जगन्नाथ पुकळे (रा. पुकळेवाडी, ता. माण) यांनी फिर्याद दिली असून, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की वडजल गावच्या हद्दीत कारंडेवाडी फाट्याजवळ म्हसवड ते मायणी रस्त्यानजीक विशाल इलेक्ट्रिकल मोटार रिवाईडिंगचे दुकान आहे.
या दुकानाच्या खिडकीचे लोखंडी गज कापून दोन अनोळखी व्यक्ती ज्यामध्ये एक अनोळखी पुरुष (वय अंदाजे ३०) व तोंडास हेडमास्क, हातात ग्लोज, पायात बूट घातलेल्या वर्णनाचा दुसरा अनोळखी पुरुष (वय अंदाजे ३०) अशा दोन अज्ञातांनी दुकानात प्रवेश केला. मोनोब्लॉक व सबमर्सिबल मोटरची रिवाईडिंगची तांब्याची तार अंदाजे ६० हजार ८० रुपये, सबमर्सिबल केबल ८५ मीटर अंदाजे किंमत आठ हजार ८०० रुपये,
जुन्या मोटरची काढलेली तांब्याची तार १७० किलो अंदाजे किंमत ८५ हजार रुपये यासह तीन व पाच एचपी मोनोब्लॉक दोन जुन्या मोटरी अंदाजे किंमत पाच हजार रुपये, दहा एचपी इंडस्ट्रियल मोटर अंदाजे किंमत १० हजार रुपये असा एकूण एक लाख ६९ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.