एकात कुटुंबातील सात सदस्यांची आत्महत्या
हरियाणाच्या पंचकुला येथे एकात कुटुंबातील सात सदस्यांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला होता.
दिल्ली : हरियाणाच्या पंचकुला येथे एकात कुटुंबातील सात सदस्यांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला होता. प्रवीण मित्तल (Pravin Mittal) हे भंगार व्यावसायिक होते. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये त्यांच्या डोक्यावर प्रचंड कर्ज झाले होते. कर्जाचा हा आकडा 20 कोटी रुपयांच्या घरात होता. या कर्जाच्या वसुलीसाठी बँकेने त्यांचा कारखाना, घर आणि अन्य मालमत्ता जप्त केल्या होत्या. त्यामुळे प्रवीण मित्तल आणि त्यांचे कुटुंब भाड्याच्या घरात राहत होते. गरिबीमुळे प्रवीण मित्तल यांच्यावर कॅब चालवायची वेळ ओढावली होती. या सगळ्यामुळे प्रवीण मित्तल यांनी आपल्या कुटुंबासह आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता.
प्रवीण मित्तल आणि त्यांचे कुटुंब सोमवारी बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) महाराजांच्या सत्संगला गेले होते. तिथून परत येताना पंचकुला येथील सेक्टर 27 मध्ये कार थांबवून कुटुंबातील सगळ्यांनी सामूहिक आत्महत्या केली. त्यांच्या कारमध्ये दोन पानांची एक चिठ्ठी सापडली आहे. त्यामध्ये आपले कुटुंब कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करत असल्याचे नमूद करण्यात आले होते.
प्रवीण मित्तल यांची पत्नी, त्यांचे आई-वडील आणि तीन लहान मुलांनी विष पिऊन आत्महत्या केली. विष प्यायल्यानंतर सगळ्यांचा जीव गेला. मात्र, प्रवीण मित्तल हे रुग्णालयात नेईपर्यंत जिवंत होते. ते गाडीच्या बाहेर येऊन बसले होते. सेक्टर 27 मधील नागरिकांनी या कारमधून टॉवेल बाहेर लटकत होता. ही गोष्ट तिथून जाणाऱ्या पुनीत राणा नावाच्या व्यक्तीला खटकली. पुनीत राणा आणि त्यांचा भाऊ दोघे कारपर्यंत चालत गेले आणि त्यांनी अंत्यवस्थ अवस्थेत फुटपाथवर बसलेल्या प्रवीण मित्तल यांच्याकडे विचारणा केली. त्यावेळी त्यांनी आपण कुटुंबासह बागेश्वर धामहून परत आलो आहोत, आम्हाला हॉटेल न मिळाल्यामुळे कार रस्त्यात थांबवून झोपण्याचे ठरवले, असे त्यांनी राणा यांना सांगितले. तेव्हा राणा यांनी त्यांना कार मार्केट परिसरात नेण्यास सांगितली. तेव्हा प्रवीण मित्तल जागेवरुन उठले. मात्र, विष प्यायल्याने त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्या हालचाली पाहून राणा यांना संशय आला आणि त्यांनी कारचा दरवाजा उघडताच आतमध्ये असलेले मृतदेह त्यांच्या नजरेस पडले.
प्रवीण मित्तल यांनी कार दुसरीकडे नेण्यासाठी दरवाजा उघडला तेव्हा पुनीत राणा यांनी आतमध्ये डोकावून पाहिले. त्यावेळी पुनीत राणा यांच्या नजरेस भयावह दृश्य दिसले. कारमध्ये सहा मृतदेह होते. कारचा दरवाजा उघडताच प्रचंड दुर्गंधी आली. कारमधील सहाजण खाली पडले होते. त्यांनी एकमेकांच्या अंगावर उलट्या केल्या होत्या. त्यामुळे कारमध्ये प्रचंड दुर्गंधी पसरली होती. हे पाहून राणांनी प्रवीण मित्तल यांना कारच्या बाहेर खेचून या प्रकाराबद्दल विचारले. तेव्हा प्रवीण मित्तल यांनी सांगितले की, आमच्या कुटुंबाने आत्महत्या केली आहे. मी देखील आता पाच मिनिटांत मरणार आहे. आमच्यावर खूप मोठं कर्ज आहे. आमचे नातेवाईक श्रीमंत आहेत, पण त्यांनी आम्हाला मदत केली नाही, असे प्रवीण मित्तल यांनी म्हटले.