जयकुमार गोरे खंडणी प्रकरणी दिल्लीतून मांत्रिकाला अटक
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्या प्रकरणात वडूज पोलिसांनी दिल्लीतून एका मांत्रिकाला अटक केली आहे.
सातारा : महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्या प्रकरणात वडूज पोलिसांनी दिल्लीतून एका मांत्रिकाला अटक केली आहे. याच मांत्रिकाच्या मार्गदर्शनाने संबंधित महिलेने गोरे यांच्याकडे खंडणी मागितल्याचा आरोप आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, एका महिलेने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्याला विवस्त्र फोटो पाठवणल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाचा महाराष्ट्रात खूपच गाजावाजा झाला होता. मात्र जयकुमार गोरे यांनी या सर्व आरोपांचे खंडन केले होते. त्यानंतर त्यांना न्यायालयाकडून जामीनही मंजूर करण्यात आला होता.
दरम्यान संबंधित महिलेने जयकुमार गोरे यांच्याकडे खंडणीची मागणी केली होती. त्या अनुषंगाने संबंधित महिलेसह या अगोदरच अनिल सुभेदार व अन्य एका पत्रकाराला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास करता वडूज पोलिसांनी दिल्लीत जाऊन अशोक शर्मा नावाच्या मांत्रिकाला अटक केली आहे.
दिल्लीतील एक मंत्री संबंधित महिलेला मदत करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार वडूज पोलिसांचे एक पथक दिल्ली येथे गेले होते. मांत्रिक अशोक शर्मा हा राजधानी दिल्लीतील लक्ष्मी नगर परिसरात वास्तव्यास होता तोच नामदार जयकुमार गोरे यांच्याकडे खंडणी मागणाऱ्या महिलेला वेळोवेळी मार्गदर्शन करत होता. त्याबाबत त्याने पोलिसांकडे तशी कबुलीही दिली आहे. या मांत्रिकाला वडूज पोलिसांच्या पथकाने मथुरेजवळ सापळा रचून मोठ्या शिताफीने अटक केली. खंडणी मागणाऱ्या संबंधित महिलेला मिळणाऱ्या खंडणीचा काही हिस्सा या मांत्रिकाला देण्याचे ठरले होते, असे याबाबत पोलिसांनी सांगितले आहे.
खंडणीप्रकरणी मांत्रिकाच्या झालेल्या अटकेमुळे या प्रकरणाला एक वेगळीच कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. मांत्रिकाच्या अटकेनंतर आणखी कोणाचा या प्रकरणात सहभाग होता, याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे.