सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यात दारुबंदी असतानाही येथे दारु विक्रेत्यांचा सुळसुळाट झाला आहे. त्यातल्या त्यात कुडाळ मधील ‘वारा’ प्यायलेल्या ‘गडे’ ने तर आपल्या अवैध साम्राज्यामुळे जावलीतील रणरागिनींनी केलेल्या ऐतिहासिक लढ्याला हरताळ फासण्याचे काम केले आहे. मात्र, या मद्यसम्राट वारागडे बाबत तेथील स्थानिक पोलीस प्रशासन मूग गिळून का गप्प आहेत, हे न सुटणारे कोडे आहे.
- विनित जवळकर
सातारा : सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यात दारुबंदी असतानाही येथे दारु विक्रेत्यांचा सुळसुळाट झाला आहे. त्यातल्या त्यात कुडाळ मधील ‘वारा’ प्यायलेल्या ‘गडे’ ने तर आपल्या अवैध साम्राज्यामुळे जावलीतील रणरागिनींनी केलेल्या ऐतिहासिक लढ्याला हरताळ फासण्याचे काम केले आहे. मात्र, या मद्यसम्राट वारागडे बाबत तेथील स्थानिक पोलीस प्रशासन मूग गिळून का गप्प आहेत, हे न सुटणारे कोडे आहे.
जावली तालुक्याला ऐतिहासिक परंपरा आहे. तसेच धार्मिक वारसाही आहे. मात्र, याचा मुलाहिजा न बाळगता कुडाळमधील वारागडेने आपल्या अवैध धंद्यांच्या जिवावर जावलीचे लचके तोडण्याचे काम सुरु केले आहे. येथील तरुण पिढी या मद्यसम्राटाच्या भुलभुलैय्यामुळे रसातळाला चालली आहे. तोंडात गुळाची ढेप ठेवून वावरणार्या या मस्तवालामुळे जावलीतील शेकडो संसार धुळीस मिळण्याच्या रेषेवर आहेत. दारु माणसाचे शरीरच नाही, तर त्याचा संसारही उद्ध्वस्त करते, हे जाणून जावली तालुक्यातील महिलांनी काही वर्षापूर्वी जावलीमध्ये उभी बाटली आडवी केली होती. म्हणजेच जावली तालुक्यात दारुबंदी केली होती. महिलांच्या या लढ्याचे माध्यमांनी त्यावेळी मुक्त कंठाने कौतुकही केले होते. मात्र, खाबुगिरीला चटावलेल्या काही खाकीवाल्यांनी या दारुला काही दिवसांतच अभय देवून टाकले. त्यामुळे या परिसरात दारु अवैधरित्या आणली जावू लागली. सातार्यातून महाबळेश्वरकडे जाताना जावलीतूनच पर्यटक ही अवैध दारू विकत घेवू लागले. तळीरामांना ही दारु ब्लॅकने विकून अवैध धंदेवाल्यांनी बक्कळ पैसा कमावून त्यातून माड्या बांधल्या. स्कॉर्पिओ, अल्टो अशा वेगवेगळ्या चारचाक्यांनी त्यांनी माया जमवली. मात्र सर्वसामान्यांची घरे रिती झाली.
कुडाळमधील दीपक वारागडे या बरेच अवैध धंदे करणार्या कुख्यात गुंडावर काही दिवसांपूर्वी मेढा पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी तडीपारीची कारवाई केली होती. याच तासगावकरांच्या नेतृत्वाखाली वारागडेच्या लॉज (की अवैध धंद्यांचा गड?) मधून अवैध मद्याने भरलेली पूर्ण गाडी पकडली गेली होती. ही कारवाई मोठी होती. मात्र, तासगावकरांच्या बदलीनंतर आजपावेतो कोणतीच मोठी कारवाई या वारागडेवर झालेली दिसून आली नाही. यानंतर वारागडेने पैशाच्या जिवावर तडीपारीची कारवाईही काही लाखांची सीसी भरुन तोडून घेतली आहे. वारागडेने आपले अवैध धंद्यांचे साम्राज्य पैशाच्या जोरावर मोठ्या प्रमाणात वाढवलेले आहे. यामध्ये मटका, अवैध दारु, क्लब, लॉज, वारांगणा यांच्या माध्यमातून तो कुडाळसह जावली तालुक्यातील तरुण पिढीला बरबाद करण्याचे कार्य बेधडक करीत आहे. या सगळ्यामध्ये त्याचा दिवटाही त्याला मदत करीत आहे. दारुची एक बाटली जर दुप्पट आणि तिप्पट भावात विकली जात असेल, तर सूज्ञाने विचारच करावा की यामधून रोजची आमदनी किती होत असेल. याबाबत शिंग आणि गंगावण असलेल्या खा की वाल्यांचे त्याला अभय असल्याची माहिती मिळत आहे. केवळ लुटुपुटूच्या कारवाया दाखवून मेढा पोलीस वारागडेच्या ताटाखालची मांजरे झाली आहेत काय? असेही यामध्ये म्हणण्यास वाव आहे.
जावलीतील अवैध दारु धंदेवाल्यांविरोधात मध्यंतरीच्या काळात एका समाजसेवकाने मोठी मोहीम हाती घेतली होती. त्यांच्या या लढ्याला यशही आले. त्यावेळी ज्या अंमलदाराच्या क्षेत्रात अवैध धंदे दिसून येतील, त्या अंमलदारांवर आणि तेथील पोलीस पाटील यांच्यावर कारवाई करण्याचे ठरले होते. मात्र या ठरावालाही कालांतराने तिलांजली देण्यात आली आणि जावलीत दारुचा महापूर आला. या तिलांजलीसाठी मोठी आर्थिक गंगा संबंधितांच्या हातावर सोडण्यात आली, हे तर शेंबडे पोरही जाणते. दारुच्या नशेमध्ये आणि त्या व्यसनापायी जावलीतील एका मुलाने आपल्या मातेवरच बलात्कार केल्याचे सुमारे महिनाभरापूर्वी उघड झाले आहे. त्यामुळे जावलीत दारुची रेलचेल असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. एकट्या कुडाळमध्येच कित्येक मटकावाले आणि अवैध दारुवाले नुसत्या खोर्याने सर्वसामान्यांचे पैसे उपसत आहेत.
जावली तालुक्यात पर्यटकांच्या नावाखाली वारागडेच्या लॉजची सेवा नक्की पर्यटकांसाठी की आणखी कोणासाठी पुरवली जाते, याबाबत माहिती घेतली असता हे लॉज म्हणजे आरामाची जागा म्हणावी, की वारांगणांचा अड्डा? हाच प्रश्न पडत आहे. या वारागडेच्या क्लबमध्ये पत्त्यांच्या माध्यमातून अनेकजण आपली दौलतजदा करण्यास येत असतात. त्यांना मद्य, जेवण व पाहिजे त्या गोष्टी जागच्या जागेवरच मिळत असल्याने दोन-दोन दिवस कोणी येथून जाण्याचे नाव घेत नाही. कित्येक किलोमीटरवरुन ही माहिती जर माध्यमाला समजत असेल तर काही किलोमीटरच्या परिघातील मेढा पोलिसांना अथवा कुडाळ पोलीस दूरक्षेत्राला याची आजिबात भणकही नाही, हे म्हणणे हास्यास्पद ठरेल. वारागडेच्या अवैध दारु, मटका, क्लब, लॉज ला नक्की अभय कोणाचे? हे सुज्ञ वाचक यातून समजू शकतात. काही हजारांच्या बदल्यात आपली अस्मिता गहाण ठेवणार्या या गणवेशातील गुंडांना शेवटी काय म्हणावे? त्यांच्याकडून परिसरातील नागरिकांनी न्यायाची अपेक्षा कशी ठेवायची? हे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
गणेशोत्सव काळात परिसरात डॉल्बी कशी वाजली, तिचे डेसिबल किती होते, मंडळांकडून कितीची बिदागी ही डॉल्बी वाजवण्यासाठी उकळण्यात आली, हेही कोणापासून लपून राहिलेले नाही. मात्र, पृथ्वीवर राज करणार्यांनी ही बिदागी घेताना परिसरातील ग्रामस्थांच्या आरोग्याचा तसूभरही विचार केला नाही. एवढेच नव्हे तर जावली तालुक्यात दारुबंदी असताना जावलीतच दारुचा महापूर कसा व कोणाच्या आशिर्वादाने, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
अवैध धंदे करुन त्यातून बक्कळ पैसा कमवायचा झाला तर नेत्यांचे पाठबळ हवेच. याच मानसिकतेतून वारागडेने काही नेत्यांचे पाय धरले आहेत. मात्र, त्याला हे माहित नाही की कार्यकर्ता म्हणून ठीक आहे. मात्र वारागडेच्या अवैध धंद्यांना हे नेते कधीच पाठबळ देणार नाहीत, हे नक्की. त्यानुषंगाने या वारागडेच्या अवैध धंद्यांना जमीनदोस्त करण्याची धमक कोणाची नसेल तर स्वत: पोलीस अधीक्षक यांनी यामध्ये लक्ष घालून कारवाई करावी, हीच या लेखन प्रपंचातून अपेक्षा!
तरुणांना व्यसनाधीन करणार्यांच्या विरोधात वेळप्रसंगी रस्त्यावर उतरु : अमितदादा कदम
विलासबाबा जवळ यांच्या माध्यमातून जावली तालुक्यातील रणरागिनींनी तालुक्यातून दारुला हद्दपार केले होते. मात्र काही समाजकंटक लोकांनी जावली तालुक्यात अवैधरित्या दारु आणून आपल्या तुंबड्या भरण्याचे काम सुरु केले आहे. अशा लोकांमुळे सर्वसामान्यांच्या संसाराची, शेतकर्यांची, तरुण पिढीची वाताहत होत आहे. याची दखल घेवून पोलीस प्रशासनाने संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. त्यामुळे तरुणांना व्यसनाधीन करणार्या या अवैध धंदेवाल्यांविरोधात प्रसंगी रस्त्यावर उतरु आणि या अवैध धंद्यांना पायबंद घालू, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अमितदादा कदम यांनी दिली आहे.
(क्रमश:)