शस्त्राचा धाक दाखवून दाम्पत्याला लुटले
शेनवडीहून - म्हसवडकडे दुचाकीरुन निघालेल्या दांपत्याला भरदिवसा लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेच्या अंगावरील सुमारे दोन लाखाचे दागिने चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवून लुटले.
मलवडी : शेनवडीहून - म्हसवडकडे दुचाकीरुन निघालेल्या दांपत्याला भरदिवसा लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेच्या अंगावरील सुमारे दोन लाखाचे दागिने चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवून लुटले. बुधवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास कराड - पंढरपूर महामार्गावर शेनवडी फाटा येथे ही घटना घडली.
या घटनेने नागरिक व प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे. म्हसवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी, श्रीपती गलंडे व सावित्री गलंडे (मुळ रा. वाक्षेवाडी ता. आटपाडी, सध्या रा. दिंघची ता. आटपाडी) हे दांपत्य बुधवार दि. 4 जून रोजी दुपारी 4:30 च्या सुमारास शेनवडीमार्गे म्हसवडला दुचाकीवरुन निघाले होते. शेनवडी फाटा येथे तीन लुटारुंनी त्यांच्या दुचाकीसमोर येवून मोटार सायकल उभी केली. दोघेजण खाली उतरले तर एकजण गाडी चालू स्थितीत उभी करुन थांबला. दोघांनी श्रीपती गलंडे यांच्या गळ्याला सुरा लावला.
अन्य चोरट्यांनीही शस्त्रांचा धाक दाखवला. दोघांना मारुन टाकीन, अशी धमकी सावित्री यांना दिली. चोरट्यांनी महिलेचे मनीमंगळसूत्र, बोरमाळ, लक्ष्मीहार, चैनीतील माळ, मिनी गंठण असे सुमारे 2 लाख 14 हजाराचे दागिने हिसकावून घेतले. सावित्री गलंडे यांनी म्हसवड पोलिस स्टेशनमध्ये याबाबतची तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस हवालदार रुपाली फडतरे तपास करत आहेत.
महामार्गावर चोरट्यांची दहशत...
कराड-पंढरपूर हा महामार्ग वर्दळीचा समजला जातो. या मार्गावर वाहतुकीचा ताणही बर्यापैकी आहे. मात्र, लुटमारीच्या प्रकाराने या मार्गावरील प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली आहे. पती-पत्नीला रस्त्यात अडवून लुटणार्या चोरट्यांनी शस्त्रांचा धाक दाखवला होता. या चोरट्यांनी आणखी काही जणांनाही टार्गेट केले असण्याची शक्यता आहे. थेट महामार्गावरच दरोड्याची घटना घडल्याने वाहन चालक व प्रवाशांत दहशत निर्माण झाली आहे.